‘स्वबोध’ हीच विकसित भारताची खरी दिशा – जे. नंदकुमार.
साद – प्रतिसाद ऑनलाईन.
पुणे : विकसित भारताचा मार्ग केवळ आर्थिक प्रगतीत नसून तो ‘स्व’च्या जागृतीत आहे, असा ठाम विचार प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी व्यक्त केला. भारतीय संस्कृती संगम, पुणे आयोजित सांस्कृतिक व्याख्यानमालेच्या ३६व्या पुष्पात ‘स्वबोध’ विषयावर ते बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर निवृत्त आयकर आयुक्त डॉ. सुहास कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर उपस्थित होते.
जे. नंदकुमार म्हणाले की, भारतीय विचारविश्वात “स्वबोध” ही संकल्पना केवळ तात्त्विक नसून राष्ट्रनिर्मितीचा मूलाधार आहे. राष्ट्रीय स्वत्वाची जाणीव हरवल्यामुळे देशासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या असून ‘स्व’ची पुनर्जागृती ही काळाची गरज आहे. भारताचे ‘स्व’ हे त्याच्या अध्यात्मात रुजलेले असून त्यातून एकात्म आणि सर्वांगीण दृष्टी निर्माण होते. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना याच विचारातून उदयास आल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद आणि श्री अरविंद यांच्या विचारांचा उल्लेख करत भारताचे ध्येय मानवजातीचे अध्यात्मिकरण करणे हेच असल्याचे सांगितले. ‘राष्ट्र ही एक जिवंत चेतना आहे’ हा दृष्टिकोन मांडत त्यांनी ‘स्व’ हा केवळ व्यक्तीपुरता मर्यादित नसून समाज, संस्कृती आणि राष्ट्राच्या चेतनेशी निगडित असल्याचे स्पष्ट केले.
भारताची स्वातंत्र्यलढाई ही केवळ राजकीय स्वराज्यासाठी नव्हती, तर सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक ओळखीच्या पुनर्प्राप्तीसाठी होती. ‘स्व’शिवाय स्वातंत्र्य अपूर्ण राहते, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
विकसित भारतासाठी ‘स्व’ प्रत्येक क्षेत्रात प्रतिबिंबित होणे आवश्यक असून शिक्षणात भारतीय ज्ञानपरंपरा, संस्कृतीत कला-साहित्य, अर्थव्यवस्थेत आत्मनिर्भरता आणि राजकारणात सभ्यतागत मूल्ये या चार स्तंभांवर ‘स्व’-आधारित विकास उभा राहू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘स्वबोध’ हीच विकसित भारताची खरी दिशा असल्याचा संदेश त्यांनी दिला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. सुहास कुलकर्णी यांनी हिंदू समाज एका प्रकारच्या सुप्त अवस्थेत असल्याचे नमूद केले. सातव्या शतकापासून भारतावर झालेल्या विविध आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर समाजाने आपला गौरवशाली इतिहास विसरला असून ‘स्व’ची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. श्रद्धा लाळे यांनी केले. डॉ. ऋचा पंडित यांनी गीत सादर केले, तर सौ. प्राची फाटक यांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली.


