क्राईम

परमहंसनगरमध्ये विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा संदेश.


साद – प्रतिसाद ऑनलाईन.

पुणे : परमहंसनगर (शास्त्री नगर परिसर) येथे सकल हिंदू संमेलन समिती व गोपालकृष्ण मंदिर आणि साईनाथ मंडळ, डी.पी. रोड यांच्या संयुक्त विद्यमाने विराट हिंदू संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पी.एम.पी.एल. डेपो, शांतिबन गणेश मंदिर समोरील परिसरात आयोजित या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटेश उदावंत, सहसंयोजक हर्षदजी सप्रे, कोषाध्यक्ष बळीराम काणांव व विजय लोणकर यांनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली. धर्माचार्य म्हणून डॉ. मकरंद उपकारे महाराज उपस्थित होते, तर प्रमुख वक्त्यांमध्ये डॉ. सौ. राधिका नंदन भोजराज आणि तुषार कुलकर्णी यांचा समावेश होता. संमेलनात सुमारे ६५० नागरिक सहभागी झाले होते.

डॉ. मकरंद उपकारे महाराज यांनी धर्म, कर्तव्य आणि जीवनमूल्ये यावर महाभारत व भगवद्गीतेतील संदर्भांसह मार्गदर्शन करत हिंदू संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. जनजागृतीसाठी पूजा, कीर्तन व नामस्मरण यांचा प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ. राधिका भोजराज यांनी संघ शताब्दी निमित्त ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनेवर भाष्य करत समरसता, स्वबोध, सेवा, नागरी कर्तव्ये आणि पर्यावरण या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

तुषार कुलकर्णी यांनी भारतीय संस्कृती, इतिहास आणि हिंदुत्व यावर प्रकाश टाकत समाजाने एकजूट राखून सांस्कृतिक मूल्यांचे जतन करण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगत आणली. रोहिदास गायकवाड व सहकाऱ्यांनी बुद्ध वंदना सादर केली, तर अवंती देवल आणि सई अभ्यंकर यांनी भरतनाट्यमद्वारे गणेश वंदना सादर केली. सुष्टी सोसायटीतील रहिवाशांनी ‘जयोस्तुते’ हे देशभक्तिपर गीत सादर करून उपस्थितांना प्रेरित केले. महेश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘पृथ्वीचा आक्रोश’ या पथनाट्याद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला, तर संतोष हिंगणे यांच्या मार्गदर्शनाखालील बालचमूंनी योग प्रात्यक्षिके सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाराणशीकर व सौ. केंगे यांनी केले, तर वक्त्यांचा परिचय राजेश मठपती यांनी करून दिला. आभार प्रदर्शन हर्षदजी सप्रे यांनी केले.

परमहंसनगर व शास्त्री नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन हा संमेलन सोहळा उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना महाप्रसाद म्हणून बुंदीचे लाडू वितरित करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »