“संघकार्य हे राष्ट्रनिर्मितीचे व्यापक कार्य” — लवळेकर
साद – प्रतिसाद ऑनलाईन.
पुणे, प्रतिनिधी (कोथरूड):
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने कोथरूड येथील डहाणूकर कॉलनी परिसरात रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी सरस्वती विद्या मंदिर शाळेत भव्य हिंदू संमेलन उत्साहात व अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाले. संमेलनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

संमेलनासाठी निमंत्रित धर्माचार्य परमपूज्य स्वामी स्वरूप स्वानंदजी यांनी आपल्या आशीर्वचनात सनातन धर्माची सर्वसमावेशक व व्यापक व्याख्या मांडली. “ईश्वराकडे जाण्याची इच्छा असलेला प्रत्येक जण, तो कोणत्याही धर्माचा असला तरी हिंदूच आहे,” असे सांगत त्यांनी सर्वसमावेशकतेचा संदेश दिला. अखिल विश्वाच्या नियमांवर चालणारी व्यवस्था म्हणजेच ईश्वराचा संघ असून त्या दिशेने प्रेरणा देणारा समाज म्हणजे हिंदू समाज होय, असे त्यांनी स्पष्ट केले. मन व बुद्धी उन्नत करून अंतर्मनातील आत्मारामापर्यंत पोहोचणे हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. रामराज्य स्थापनेसाठी प्रत्येकाने केवटाप्रमाणे आपली भूमिका जबाबदारीने पार पाडावी, असे त्यांनी आवाहन केले.
धर्माचार्य डॉ. सुधीर पांडे यांनी अध्यात्माच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महत्त्व स्पष्ट करत रामराज्य आणि आधुनिक लोकशाही व्यवस्थेतील साम्य उदाहरणांसह उलगडले. रामकथेतील मूल्यांचा अवलंब करून लोकशाही मार्गाने सुसंस्कृत, मूल्याधिष्ठित समाजव्यवस्था उभी राहू शकते, असे त्यांनी सांगितले.
मातृशक्ती वक्त्या डॉ. सौ. वैशाली हर्सूलकर यांनी ‘पंचसूत्री’च्या माध्यमातून स्व-परिवर्तन, सजगता आणि शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. “काकचेष्टा बको ध्यानं…” या सुभाषिताच्या आधारे सतत प्रयत्नशीलता, ध्येयावर लक्ष, सावधानता आणि आत्मानुशासन या गुणांचा अंगीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले. व्यक्तीने स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीस हातभार लावावा, असे त्यांनी नमूद केले.

संघ वक्ते श्री लक्ष्मीप्रसाद लवळेकर यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांच्या कार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला. संघकार्य हे केवळ संघटनेपुरते मर्यादित नसून ते राष्ट्रनिर्मितीचे व्यापक कार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संकटकाळात स्वयंसेवकांनी नेहमीच पुढाकार घेत समाजसेवेची परंपरा जपली असून युद्धकाळ, नैसर्गिक आपत्ती तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये संघाचे योगदान उल्लेखनीय राहिले असल्याचे त्यांनी उदाहरणांसह सांगितले. संघाची शिस्त, निःस्वार्थ भाव आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांमुळे समाजात एकात्मता आणि कर्तव्यभावना दृढ होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. शंखनाद व “भारत माता की जय” घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. परिसरातील बालकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित “जयस्तुते जयस्तुते” हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच गीता पठण स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या संमेलनादरम्यान भारतमाता पूजन, गोमाता पूजन, संत पूजन, ग्रंथ पूजन तसेच पालखीतून देवतापूजन यांसारखे विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमही पार पडले.
या कार्यक्रमाला डॉ. सौ. मेधा कुलकर्णी (राज्यसभा खासदार), श्री पृथ्वीराज दादा सुतार (नगरसेवक व गटनेते, पुणे मनपा), सौ. वासंती जाधव, श्री दिनेश माथवड, सौ. ज्योत्स्ना कुलकर्णी (नगरसेवक) यांच्यासह श्री आनंद देशमुख (सवाई महोत्सवात ३३ वर्षे निवेदन केल्याबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद), भागवत आजोबा (वय ९० वर्षे असूनही संपूर्ण कार्यक्रमास उपस्थित), श्री अशोक पुजारी (अध्यक्ष, हास्य क्लब डहाणूकर), श्री नितीन गोखले, श्री श्याम देशपांडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमासाठी सार्थक बिल्डर, लोटस बिल्डर, कुंदन बिल्डर, आयडीबीआय बँक (डहाणूकर कॉलनी) तसेच शुभम व्हेज, लीला व्हेज, श्री दत्त टी सेंटर, दुर्गा कॉफी शॉप यांसारख्या स्थानिक व्यापारी व संस्थांचे सहकार्य लाभले. तारांगण, कपिल, चंद्रलोक नगरी, डहाणूकर रेजन्सी, डहाणूकर रेसिडेन्सी परिसरातील नागरिकांसह विविध सामाजिक व सांस्कृतिक मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या संमेलनाला सुमारे ४०० हून अधिक महिला व एकूण ७५० नागरिकांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सौ. अस्मि अच्युते यांनी केले.


