क्राईमशहर

पदपथ मोकळे करण्याच्या घोषणेनंतरही अतिक्रमण जैसे थे ? – क्रिएटिव्ह फाउंडेशनचा सवाल नदीपात्र रस्ता, सिटी पोस्ट चौक, म्हात्रे पूल परिसरातील परिस्थितीवर संदीप खर्डेकर यांचे निवेदन


साद – प्रतिसाद ऑनलाईन.

पुणे :

पदपथ व रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक ठिकाणी परिस्थिती “जैसे थे” असल्याचा आरोप क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केला आहे. त्यांनी याबाबत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना निवेदन दिले आहे.

 

गेल्या आठवड्यात महापालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे पुणेकरांमध्ये पदपथ मोकळे होतील आणि वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक भागात पदपथांवर पथारीवाले तसेच रस्त्यावर अनियमित पार्किंगमुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले असल्याचे खर्डेकर यांनी नमूद केले.

 

सिटी पोस्ट चौक परिसरात रविवारी सायंकाळी पदपथ पूर्णपणे व्यापले गेले होते, तर रस्त्यावर रिक्षा आणि चारचाकी वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नदीपात्रातील नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरही विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उभारल्याचे छायाचित्रांसह त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

 

म्हात्रे पूल ते राजाराम पूल दरम्यानही रस्ते विक्रेत्यांनी व्यापले असून खरेदीदारांची वाहने वेडीवाकडी उभी केल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच इमारतींच्या फ्रंट आणि साईड मार्जिन तसेच पार्किंग जागांचा गैरवापर होत असून त्यामुळे रस्त्यावर पार्किंग वाढत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

 

अतिक्रमणाविरोधातील कारवाईपूर्वी संबंधितांना माहिती देणारे कर्मचारी तसेच सातत्याने अतिक्रमण होणाऱ्या भागातील अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच जर कोणते लोकप्रतिनिधी कारवाई करू नका असा दबाव टाकत असतील, तर त्यांची नावे जाहीर करावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

यासोबतच वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, जप्त केलेले साहित्य तातडीने परत न देणे अशा कायदेशीर उपाययोजनांचा विचार करून ठोस कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »