मुठा नदीपात्र सफाईची मागणी; बाबा भिडे पुलाचे काम कधी पूर्ण होणार ? संदीप खर्डेकर.
साद -प्रतिसाद ऑनलाईन.
पुणे : शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने पावसाळ्यापूर्वी तातडीने सफाई करावी, अशी आग्रही मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पुणे मनपाचे आयुक्त मा. नवलकिशोर राम यांना निवेदन देण्यात आले.
डेंगळे पूल ते म्हात्रे पूल या दरम्यानचा नदीपात्राचा भाग अत्यंत अस्वच्छ झाला असून, बाबा भिडे पुलाशेजारील परिस्थितीचे छायाचित्रांसह निदर्शनास आणून देण्यात आले आहे. सदर कचरा वेळेत हटवला नाही, तर अवकाळी पाऊस किंवा पावसाळ्यात हा कचरा वाहून जाऊन इतर भागात अडकण्याची शक्यता आहे. कवडीपाट परिसरात अशाच कचऱ्यामुळे स्थलांतरित परदेशी पक्ष्यांचे प्रमाण कमी झाल्याचेही समोर आले आहे.
तसेच नदीपात्रात मेट्रोचे साहित्य पडून असल्याने तेही पावसाळ्यापूर्वी हटविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, बाबा भिडे पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच असून, वारंवार वाहतूक बंद करूनही काम अपूर्णच असल्याची नागरिकांची तक्रार आहे. मेट्रो प्रशासनाशी समन्वय साधून पुलाचे काम नेमके कधी पूर्ण होणार आणि येथील बॅरिकेड्स कधी हटवले जाणार, याची स्पष्ट माहिती जाहीर करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


