दुचाकी चोरीचा पर्दाफाश : वारजे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक, अल्पवयीनाकडून १० मोटारसायकली जप्त.
साद -प्रतिसाद ऑनलाईन.
पुणे : वारजे माळवाडी पोलिसांनी दुचाकी चोरीच्या घटनांवर मोठी कारवाई करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याच्याकडून तब्बल १० मोटारसायकली जप्त केल्या आहेत. मौजमजेसाठी दुचाकी चोरी करत असल्याची कबुली संबंधित अल्पवयीनाने पोलिस तपासात दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे व त्यांच्या पथकाने तपासादरम्यान संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने विविध भागांतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान वारजे, कोथरूड, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड आदी परिसरातून चोरीस गेलेल्या एकूण १० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त वाहनांमध्ये स्प्लेंडर प्लस, युनिकॉन , हिरो पॅशन प्रो, होंडा शाईन, अॅक्टिव्हा मोपेड, लेजर मोपेड आदी दुचाकींचा समावेश आहे.
पोलीसांनी सांगितले की, आरोपी अल्पवयीन मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरी करत होता. या कारवाईमुळे शहरातील वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत व संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, संभाजी कदम, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३ पुणे शहर, सुजाता तानवडे, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. तसेच महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रकाश धेंड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), वारजे माळवाडी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार बालाजी काटे, योगेश वाघ, शरद पोळ, निखील तांगडे, अमित जाधव, अमित शेलार, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे, महादेव शिंदे, सागर कुंभार व अमोल सुतकर यांनी ही कारवाई केली.


