डीपी रस्त्यांसाठी जागामालकांना १०० टक्के मोबदला द्या; स्वप्निल दुधाने यांची मागणी.
पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी रखडलेले डीपी रस्ते लवकरात लवकर विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्ता बाधित जागांचे भूसंपादन करताना जागामालकांना २० टक्के अवमूल्यन न करता १०० टक्के मोबदला देण्यात यावा, अशी मागणी पुणे महापालिकेचे नगरसेवक तथा शहर सुधारणा समितीचे सदस्य स्वप्निल देवराम दुधाने यांनी केली.
डीपी रस्त्यांसाठी संबंधित जागामालकांकडून जागा हस्तांतरित होत नसल्याने शहरातील अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. सध्या जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून रोख मोबदला देऊन सक्तीचे भूसंपादन केले जात आहे. मात्र ही प्रक्रिया किचकट असून त्यासाठी साधारण तीन ते साडेतीन वर्षांचा कालावधी लागू शकतो.
महापालिकेकडून तडजोडीने जागा ताब्यात घेतल्यास ही प्रक्रिया साधारण सहा महिन्यांत पूर्ण होऊ शकते. मात्र तडजोडीने जागा घेताना जागेच्या मोबदल्यात २० टक्के अवमूल्यन होत असल्याने जागामालक रस्ता बाधित जागा देण्यास टाळाटाळ करतात, असे दुधाने यांनी सांगितले.
यामुळे महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेऊन तडजोडीने जागा ताब्यात घेतानाही २० टक्के अवमूल्यन न करता १०० टक्के मोबदला द्यावा, अशी मागणी दुधाने यांनी महापौर व महापालिका आयुक्तांकडे केली.
या निर्णयामुळे जागामालकांना योग्य मोबदला मिळण्यासोबतच डीपी रस्त्यांसाठी आवश्यक जागा लवकर महापालिकेच्या ताब्यात येऊन रस्ते विकासाला गती मिळेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.


