वारजे–कर्वेनगर वॉर्ड ऑफिस परिसरात अस्वच्छतेचा गंभीर प्रकार; दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे आढळल्याने व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.
साद – प्रतिसाद ऑनलाईन.
पुणे | प्रतिनिधी : वारजे–कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या खालील मजल्यावरील परिसरात प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अस्वच्छतेची गंभीर व चिंताजनक स्थिती समोर आली आहे.
अतिक्रमण विभागाने जप्त करून आणलेल्या हातगाड्या व टपऱ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ठेवण्यात आल्या असून, या भागातील व्यवस्थापन ढिसाळ झाल्याचे स्पष्ट दिसून येते.

परिसरात रिकाम्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, स्नॅक्सची पाकिटे तसेच इतर कचरा विखुरलेल्या अवस्थेत आढळून आला. काही ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्याही निदर्शनास आल्या आहेत.
सडलेल्या अवस्थेतील भाजीपाला व फळांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून एकूणच वातावरण अस्वस्थ करणारे झाले आहे.

सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे या परिसरात पाणी साचून राहण्याची शक्यता निर्माण झाली असून, अशा परिस्थितीत डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो, अशी स्थिती दिसून येते.
सदर पाहणी प्रत्यक्ष स्थळ भेटीदरम्यान करण्यात आली असून परिसरातील स्वच्छता व व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


