क्राईम

कोथरूड गावठाणात हिंदुत्वाचा जागर; सकल हिंदू संमेलनात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


साद – प्रतिसाद ऑनलाईन.

पुणे, प्रतिनिधी (कोथरूड):
दिनांक २२ मार्च २०२६ रोजी कोथरूड गावठाण आणि नॉर्थ डहाणूकर कॉलनी परिसरात सकल हिंदू संमेलनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी ग्रामदैवत म्हातोबा यांचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला शुभारंभ केला. केशव शंखनाद पथकाच्या गजरात मान्यवरांचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला मॉडर्न हायस्कूल, वारजे येथील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पर्यावरण संरक्षण या विषयांवर प्रभावी पोवाडा सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. त्यानंतर मानसी वझे आणि सहकलाकारांनी सादर केलेल्या गणेश वंदनेमुळे वातावरण भक्तिमय झाले.

या संमेलनाला राष्ट्रीय युवा कीर्तनकार ह.भ.प. रितिका ताई कदम यांचे आशीर्वचन लाभले. त्यांनी हिंदू धर्माचे महत्त्व, त्याचे जतन आणि समाजात आदर्श वर्तन कसे असावे यावर मार्गदर्शन केले. स्मिता कुलकर्णी यांनी भारतीय कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करत, त्यातून सशक्त भारताची निर्मिती शक्य असल्याचे प्रतिपादन केले.
सार्थक शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान, कार्यकर्त्यांचे समर्पण आणि जम्मू-काश्मीर ते केरळपर्यंत झालेला विस्तार याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच संघाच्या विविध सेवा उपक्रमांमुळे समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचणाऱ्या कार्याचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुश्री ताई कदम यांनी प्रभावीपणे केले. पल्लवी पाटील सांगवीकर (सह संयोजिका) यांनी प्रास्ताविक करत संमेलनामागील उद्दिष्ट स्पष्ट केले तसेच शेवटी आभार प्रदर्शन केले.

या संमेलनास एकूण ३४४ नागरिक उपस्थित होते, यामध्ये १५७ महिला आणि १८७ पुरुषांचा सहभाग होता. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, शिस्त आणि हिंदुत्वाचा जागर सर्वत्र अनुभवायला मिळाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »