सामाजिक

मयूर कॉलनीत हिंदू संमेलन उत्साहात; पालखी सोहळा, प्रात्यक्षिके आणि प्रेरणादायी विचारांनी भारले वातावरण.


साद – प्रतिसाद ऑनलाईन.

 

पुणे (मयूर कॉलनी) : दि. २१ मार्च २०२६ रोजी मयूर कॉलनी येथे हिंदू संमेलन अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात शिंदे वस्ती येथील दत्त मंदिरात आरतीने झाली. रामनवरात्राच्या पार्श्वभूमीवर शिंदे वस्ती ते पी. जोग शाळा असा रामाच्या पालखीचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.

पालखी सोहळ्यात वारकरी संप्रदायातील लहान वारकऱ्यांनी टाळ वाजवत रिंगण करून वातावरण भक्तिमय केले. वारकरी आणि धारकरी या दोन्ही परंपरांनी एकत्रितपणे मयूर वस्तीत दणदणीत उपस्थिती लावली आणि संमेलन स्थळी आगमन केले.

कार्यक्रमात सौ. प्रियांका केरकर व त्यांच्या शिष्यांनी लाठीकाठी, दांडपट्टा आणि तलवारबाजीची प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. पालखी आगमनानंतर वारकरी व धारकरी यांनी एकत्रित टाळ धरून संमेलनस्थळी वातावरण भारावून टाकले.

यानंतर श्रीराम, सीता, हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत माता यांच्या प्रतिमांचे पूजन करून मुख्य कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. गौरी दैठणकर व त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अमोल जोग, संयोजक श्री. दिलीपराव नगरकर, ह.भ.प. निवेदिताताई मेहेंदळे, मातृशक्ती वक्त्या सौ. विभावरीताई बिडवे आणि प्रमुख वक्ते श्री. आनंद कुलकर्णी यांचा यावेळी परिचय व सत्कार करण्यात आला.

संमेलनाआधी घेतलेल्या रांगोळी व पाठांतर स्पर्धांच्या विजेत्यांना यावेळी बक्षिसे देण्यात आली. ह.भ.प. निवेदिताताई मेहेंदळे यांनी सावरकर व हिंदुत्व या विषयावर नारदीय कीर्तन सादर करत समाजप्रबोधनाचा संदेश दिला. मातृशक्ती वक्त्या सौ. विभावरीताई बिडवे यांनी संविधान, नागरिक कर्तव्य, पर्यावरण व कुटुंब प्रबोधन यावर मार्गदर्शन केले.

प्रमुख वक्ते श्री. आनंद कुलकर्णी यांनी संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील आव्हाने आणि संघटनाची भूमिका यावर प्रभावी भाष्य केले.

कार्यक्रमात गौरी दैठणकर यांच्या शिष्यांनी ‘जयोस्तुते’ आणि ‘वंदे मातरम’ या गीतांवर भरतनाट्यम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर कॉलनी वस्ती प्रमुख श्री. ओंकार लाळे यांनी केले, तर सूत्रसंचालन सौ. जयश्री बापट यांनी केले. या भव्य संमेलनास एकूण ४६० नागरिकांची उपस्थिती लाभली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »