कोथरूड आयडियल कॉलनीत हिंदू संमेलन उत्साहात; गोखले यांनी उलगडले हिंदू जागरणाचे चार टप्पे.
साद – प्रतिसाद ऑनलाईन.
पुणे, प्रतिनिधी (कोथरूड):
कोथरूडमधील आयडियल कॉलनी येथे रविवार, दि. २२ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेले विराट हिंदू संमेलन उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडले. या संमेलनास एकूण ७९० जणांची उपस्थिती लाभली असून, त्यामध्ये ४१० महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रस्ताविकाने झाली.
त्यानंतर विविध सांस्कृतिक, बौद्धिक आणि समाजप्रबोधनात्मक उपक्रमांनी वातावरण भारावून गेले. चित्रकला व निबंध स्पर्धांमधील बाल व प्रौढ गटातील स्पर्धकांना सौ. शामला लोणकर यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. गृहसंवाद अभियानांतर्गत कॅरम स्पर्धा तसेच पर्यावरण संवर्धनासंबंधी उपक्रमांचा आढावा यावेळी सादर करण्यात आला.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणजी पांडकर यांनी प्रभावीपणे केले.
सो. अदवंत यांनी रामरक्षा स्तोत्र व भीमरूपी स्तोत्राचे सामुदायिक पठण घेतले. त्यांच्या सादरीकरणाबद्दल मा. श्री. वढावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसिद्ध लेखक व मोटिव्हेशनल स्पीकर श्री. धनंजय गोखले यांनी आपल्या उद्बोधनात हिंदू धर्मातील जागरण प्रक्रियेचे चार टप्पे—जागृती, प्रत्यक्ष जागरण, संभ्रमाची जाणीव आणि कृतीतील स्पष्टता—यांचे सविस्तर विवेचन केले. भगवद्गीतेतील संदर्भ आणि अनुभवांच्या आधारे त्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले. यावेळी त्यांच्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
यानंतर सौ. सीमा गोरे व स्मिता भागवत यांनी शिवतांडव स्तोत्राचे प्रभावी सादरीकरण केले, तर सौ. सीमा बर्वे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सोनाली नाथ यांनी ‘पंचपरिवर्तन’ या संकल्पनेवर भाष्य करत समाजातील एकजुटीमुळे सकारात्मक बदल घडतात, असा संदेश दिला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर सहकार्यवाह मंगेश घाटपांडे यांनी संघशताब्दी निमित्त संघकार्याचा आढावा घेतला. डॉ. हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या संघाच्या कार्यामागील उद्दिष्टे, स्वातंत्र्यपूर्व काळातील आव्हाने आणि गेल्या शतकातील सामाजिक परिवर्तन यांचे त्यांनी सविस्तर विवेचन केले. तसेच विविध संघटनांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमात सौ. ज्योती ब्रह्मे यांनी प्रतापगडावरील शिवराय-अफझलखान भेटीचा पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
शेवटी अश्विनी जोशी यांच्या सुश्राव्य पसायदानाने संमेलनाची सांगता झाली.


