“एरंडवणेतील हिंदू संमेलनात धर्मपालनाचा संदेश — कौस्तुभ प्रभुजींचे प्रभावी मार्गदर्शन”
साद – प्रतिसाद ऑनलाईन.
पुणे (प्रतिनिधी) : संभाजी भागातील दिनानाथ परिसरात सकल हिंदू समाज, गणेशनगर तरुण मंडळ आणि नवयुग तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ मार्च रोजी सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत एरंडवणे येथील आबासाहेब पटवर्धन क्रीडा संस्था मैदानावर हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत संपूर्ण परिसर हिंदू एकतेच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
संमेलनात धर्माचार्य म्हणून श्री कौस्तुभ प्रभुजी (इस्कॉन मंदिर, कात्रज), प्रमुख वक्ते मा. श्री सुहासराव हिरेमठ (अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, रा. स्व. संघ), अध्यक्ष मा. श्री परेश गरुड तसेच मातृशक्ती वक्त्या डॉ. मृणालताई नेर्लेकर (मेडिसिन विभाग प्रमुख, भरती विद्यापीठ, होमिओपॅथी महाविद्यालय) उपस्थित होते.
प्रमुख वक्ते सुहासराव हिरेमठ यांनी आपल्या भाषणात हिंदू समाजाच्या एकतेवर भर देत “आपण हिंदू म्हणून जागृत व संघटित झालो तरच आपल्या सर्व समस्या सोडवता येतील,” असे ठामपणे सांगितले. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी “पुढील ५० वर्षे भारत मातेलाच आपली आराध्य देवता मानून कार्य करा,” असा संदेश दिला. “गर्व से कहो हम हिंदू है” या घोषणेतून त्यांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला.
मातृशक्ती वक्त्या डॉ. मृणालताई नेर्लेकर यांनी ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनेचे महत्त्व विशद करत स्वदेशी जीवनशैलीचा पुरस्कार केला. “आपली भाषा, भूषा, भुवन, भ्रमण आणि भोजन स्वदेशी असले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. धर्माचार्य श्री कौस्तुभ प्रभुजी यांनी धर्मपालनाचे महत्त्व सांगत छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम यांचे आदर्श पुढे ठेवण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात श्री परेश गरुड यांनी, “आज हिंदू समाज मोठ्या संख्येने एकत्र आला आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. भविष्यातही ही एकजूट कायम ठेवूया,” असे आवाहन केले.
कार्यक्रमात २१ बालचमूंनी भीमरूपी पठण सादर केले. लहान मुलांच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले. कालिका नृत्यालयाच्या विद्यार्थिनींच्या कथ्थक नृत्याने तसेच सौ. ऋतुजा तारे व सहकलाकारांच्या ‘स्वर संध्या’ने कार्यक्रमात रंगत आणली. मान्यवरांच्या हस्ते सांस्कृतिक वार्तापत्राच्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
संमेलनात पुस्तक विक्री, गोसेवा व गोवस्तू, तसेच विविध उत्पादनांचे स्टॉल लावण्यात आले होते.
या सर्व उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण वंदे मातरम्ने वातावरण दुमदुमले आणि रामखिचडीच्या प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास नगरसेवक सुनील पांडे, नगरसेवक पुनित जोशी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व मिताली सावळेकर यांच्यासह प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक उपस्थित होते. एकूण सुमारे ४०० पुरुष, ३५० महिला आणि ३० कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. मोनिकाताई मोडक यांनी केले.


