धर्म, संस्कृती आणि एकतेचा संगम; दिनदयाळ वस्तीतील हिंदू संमेलन गाजले.
साद – प्रतिसाद ऑनलाईन.
पुणे, प्रतिनिधी (एरंडवणे) : दिनदयाळ परिसरात वाल्मिकी प्रभात शाखा व रामराज्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनदयाळ शाळा येथे दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री आशिषजी काँटे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून श्री अतुल कुलकर्णी (जनकल्याण समिती) उपस्थित होते. धर्माचार्य म्हणून श्री चोरगे महाराज यांनी आशीर्वचन दिले. मातृशक्ती उद्बोधन सौ. भक्तीताई साठे यांनी केले.
आशीर्वचन देताना श्री चोरगे महाराज यांनी “जो धारण करतो तो धर्म आणि जो वर्म जाणतो तो धर्म” असे सांगत हिंदू धर्माचे महत्त्व अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मरक्षणासाठी केलेल्या कार्याची आठवण करून देत त्यांनी हिंदू समाजाने संस्कृती जपण्याचे आवाहन केले.
यानंतर समीक्षा जोशी व आकांक्षा जोशी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित “जयोस्तुते” हे गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
मातृशक्ती वक्त्या सौ. भक्तीताई साठे यांनी आपल्या भाषणात हिंदू समाज ‘विश्वगुरू’ पदाकडे वाटचाल करत असल्याचे सांगितले. पंचपरिवर्तनाचा संदेश देत त्यांनी पाणी, पर्यावरण आणि प्लास्टिकमुक्ती यावर समाजाने एकत्रित काम करण्याचे आवाहन केले. तसेच स्वबोध आणि शत्रूबोध यांची गरज त्यांनी अधोरेखित केली.
अध्यक्षीय भाषणात श्री आशिष काँटे यांनी हिंदू समाज एकत्र राहण्याची गरज व्यक्त केली. आर्थिक व्यवहारांमध्येही स्वदेशी व हिंदू माध्यमांना प्राधान्य देण्याचे त्यांनी सुचवले.
प्रमुख वक्ते श्री अतुल कुलकर्णी यांनी संघकार्याचे महत्त्व स्पष्ट करत “Nation First” हा विचार अंगीकारण्याचे आवाहन केले. समाज संकटात असताना संघ नेहमी पुढे येतो, असे सांगत त्यांनी हिंदू एकतेची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने विशेष रंगत आणली. तसेच सदिच्छा प्रार्थना मंच यांनी जोशपूर्ण रामतांडव स्तोत्र सादर केले.
सूत्रसंचालन समीक्षा जोशी व आकांक्षा जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन आशिष काँटे यांनी मानले. कार्यक्रमास नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, संदीप खर्डेकर, सुनील पांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.एकूण २८२ नागरिकांनी या संमेलनात सहभाग घेतला असून त्यात १२२ पुरुष, १४२ महिला आणि १८ कार्यकर्त्यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी रामखिचडी प्रसादाचा लाभ घेतला.


