“रामनगर वस्तीतील विराट हिंदू संमेलनात मुकुंदराव सहस्त्रबुद्धे यांनी ‘संघाच्या १०० वर्षांची गाथा’ प्रभावीपणे उलगडली
साद – प्रतिसाद ऑनलाईन.
वारजे, प्रतिनिधी:
वारजे नगरातील रामनगर वस्ती येथे सकल हिंदू समाज आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने कै. वनाबाई बराटे प्रा. शाळेच्या भव्य प्रांगणात विराट हिंदू संमेलन उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात शंखनादाने होत मान्यवरांच्या हस्ते दीपपूजन तसेच भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज आणि सवत्स धेनु पूजनाने झाली.
संमेलनाचे संयोजक ह.भ.प. श्री भाऊ महाराज फुरसुंगीकर यांनी आपल्या वारकरी शैलीत प्रभावी प्रास्ताविक करत हिंदू संमेलनाचे महत्त्व उपस्थितांसमोर मांडले. धर्माचार्य महंत श्री श्रीकांत दास धुमाळ महाराज यांनी आशीर्वचनातून हिंदू संस्कृतीचे जतन, महिला सक्षमीकरण आणि कुटुंबातील संस्कार यांवर मार्गदर्शन केले.
मातृशक्ती वक्त्या वंदना ताई नवघरे यांनी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर सामाजिक समरसतेचा संदेश देत राम-शबरी संवादाचे उदाहरण सादर केले. प्रमुख वक्ते मुकुंदराव सहस्त्रबुद्धे यांनी “संघाच्या १०० वर्षांची गाथा” या विषयावर प्रभावी मांडणी करत संघकार्याची व्यापकता आणि समाजघडणीतील योगदान स्पष्ट केले.
कार्यक्रमात स्थानिक बालकलाकारांनी महाराष्ट्र गीत, शिव वंदना, शंभू वंदना, पोवाडे आणि विविध सांस्कृतिक नृत्य सादर करून वातावरण भारावून टाकले. सूत्रसंचालन श्री चंद्रकांत पंडित यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री चेतन गोंडाळ यांनी मानले. पसायदान आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या संमेलनात स्थानिक स्वराज्य संस्था, विविध मंदिरे, गणेश मंडळे, शिवजयंती मंडळे, युवक गट आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. माजी महापौर दिलीप भाऊ बराटे, युवा नगरसेवक भारतभूषण बराटे, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका सायली ताई वांजळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला एकूण ८६५ नागरिकांची उपस्थिती लाभली असून त्यामध्ये ३८५ पुरुष व ४८० महिलांचा समावेश होता.
विशेष:
रामनगर वस्तीतील नागरिकांनी गेल्या दीड महिन्यापासून एकत्र येत अत्यंत नियोजनबद्ध तयारी करून या भव्य संमेलनाला यशस्वी केले. लहान मुले, तरुण आणि स्थानिकांनी विविध जबाबदाऱ्या उत्साहाने पार पाडत एकजुटीचे सुंदर उदाहरण घालून दिले.


