सामाजिक

वारजेतील पॉप्युलरनगरमध्ये विराट हिंदू संमेलनाचा जल्लोष; १४०० भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती.


साद -प्रतिसाद ऑनलाईन.

वारजे (पुणे): रविवार, दिनांक २९ मार्च रोजी पॉप्युलरनगर वस्ती परिसरातील राघवदास विद्यालयाच्या मैदानावर ‘विराट हिंदू संमेलन’ मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमस्थळी आकर्षक रांगोळी, अष्टगंध, हळदीकुंकू व अत्तर लावून उपस्थितांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम आणि भारतमातेच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. शंखनादाने वातावरण भक्तिमय झाले. सौ. सपना गोडघासे यांनी प्रस्तावना मांडली, तर श्री. धनंजय आपटे यांनी ‘वंदे मातरम्’ सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमांत ‘मुद्रा भरतनाट्यम संस्था’च्या विद्यार्थिनींनी गणेशवंदना व शिवस्तुती सादर केली. स्वामी स्वरूप स्वानंद श्री. सुधीर पांडे यांनी हिंदू संमेलनाचे महत्त्व व प्रभू श्रीराम नामाचा अर्थ स्पष्ट केला. मातृशक्ती वक्त्या सौ. स्मिताताई आपटे यांनी ‘कुटुंब प्रबोधन’ व ‘समरसता’ यावर प्रभावी मार्गदर्शन केले.

चिमुकल्या कलाकारांनी ‘शिवबा राजा’ गीत, पोवाडा तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे उपस्थितांची दाद मिळवली. प्रमुख वक्ते श्री. तुषार दामगुडे यांनी हिंदू समाजाची एकता, कर्तव्ये व आव्हाने यावर परखड विचार मांडत संघटित होण्याचे आवाहन केले.

सांगता समारंभात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लाठी-काठी व तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता हनुमान चाळीसाने झाली. उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या संमेलनात सुमारे ५५० पुरुष, ८०० महिला आणि ५० बालके अशा एकूण १४०० भाविकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे संयोजन श्री. रणजीत टेमघरे यांनी केले, तर सूत्रसंचालन सौ. प्राची रामाने व सौ. सपना गोडघासे यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »