भव्य पालखी, हजारोंची गर्दी; वारजेत श्रीराम नवमी सोहळा उत्साहात पार.
साद -प्रतिसाद ऑनलाईन.
पुणे (वारजे): गोकुळनगर सहयोग नगर, वारजे येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित भव्य श्रीराम नवमी पालखी सोहळा आणि हिंदू संमेलन उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडले. 26 मार्च 2026 रोजी गौड ब्राम्हण समाज चारभुजा मंदिर परिसरात हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आला होता.
सायंकाळी 4 वाजता दत्त मंदिरापासून पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. ढोल-ताशा व पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत सुमारे 1200 नागरिक सहभागी झाले होते. पुरुष, महिला, तरुण व बालकांचा मोठा सहभाग यावेळी पाहायला मिळाला. विविध ढोल-ताशा पथकांनी वातावरण भक्तिमय केले. संपूर्ण परिसरातून फिरत ही शोभायात्रा सायंकाळी 7 वाजता सामूहिक आरतीने संपन्न झाली.
यानंतर आयोजित हिंदू संमेलनात मान्यवरांच्या हस्ते भारत माता पूजन व प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. निलेशजी भिसे यांनी आपल्या भाषणातून हिंदू धर्माचे प्राचीनत्व, स्त्रीचे महत्त्व आणि समाजातील एकोप्याची गरज अधोरेखित केली. हिंदूंनी जात-पंथ भेद विसरून एकत्र राहावे तसेच आपल्या संस्कृतीचे जतन करत पुढील पिढीला संस्कार देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास नगरसेवक श्री. भारतभूषण बराटे, श्री. सचिनभाऊ दोडके तसेच माजी नगरसेवक श्री. किरण बारटक्के यांची उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन स्वप्नील बेंडे यांनी केले.
कार्यक्रमात एकूण सुमारे 1100 नागरिक उपस्थित होते, त्यामध्ये 500 पुरुष व 600 महिलांचा समावेश होता. कार्यक्रमानंतर जवळपास 5000 नागरिकांनी भोजन प्रसादाचा लाभ घेतला.
गेल्या चार वर्षांपासून या पालखी सोहळ्याचे सातत्याने आयोजन करण्यात येत असून, परिसरातील सर्व नागरिक जात-पंथ भेद विसरून एकत्र येतात, ही या सोहळ्याची खास वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही प्रकारचा कर्णकर्कश डीजे न वापरता फक्त पारंपरिक ढोल-ताशा व हलगी या वाद्यांचा वापर करण्यात आला, ज्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळण्यात आले.
नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, शिस्तबद्ध नियोजन आणि पारंपरिक पद्धतींचे जतन यामुळे हा श्रीराम नवमी पालखी सोहळा एकतेचे व संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडवणारा ठरला.


