सामाजिक

कर्वेनगरात ‘गीतरामायणाची’ भक्तिमय मैफिल; रामनामाने दुमदुमला परिसर.


साद – प्रतिसाद ऑनलाईन.

 

पुणे (कर्वेनगर) : “जय श्रीराम”च्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात ‘सुरभी, पुणे’ प्रस्तुत गीतरामायण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. संपूर्ण परिसर राममय झाला असून रामनामाने कर्वेनगर नगरी दुमदुमली अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी आनंद माडगूळकर, सौ. तेजश्री ताई पवळे (नगरसेविका), प्रवीण चिखलकर (संस्थापक – सुरभी) आणि प्रफुल्ल फिसफिसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विशेष म्हणजे ग. दि. माडगूळकर यांचे पुत्र आनंदजी माडगूळकर सपत्नीक उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला विशेष मान प्राप्त झाला.

गायनात प्रणव धारणे, केदार चिखलकर, साक्षी देशपांडे यांनी आपल्या सुमधुर आवाजात गीतरामायणातील प्रसंग जिवंत केले. या सादरीकरणाला सिंथेसायझरवर हितेश क्षीरसागर, संवादिनीवर प्रविण चिखलकर, बासरीवर अविनाश वाघ, तबल्यावर अथर्व बेलसरे व वरद अमणेकर तसेच तालवाद्यांवर नरेंद्र काळे व हेरंब गाडगीळ यांनी सुरेल साथ दिली. कोरस मध्ये अक्षय शिंदे, राखी फिसफिसे, सुमित झुरंगे आणि निलेश कुलकर्णी यांनी प्रभावी साथ देत कार्यक्रम अधिक समृद्ध केला, तर निवेदन हर्षदा जोशी-क्षीरसागर यांनी केले.

कार्यक्रमात “दशरथा घे हे पायसदान” आणि “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” यांसारखी लोकप्रिय गाणी ‘वन्स मोर’ने सादर करण्यात आली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला श्री प्रमोद शिंदे, श्री आनंद माडगूळकर, सौ. तेजश्री ताई पवळे यांची मान्यवर उपस्थिती लाभली. कर्वेनगर येथील सी. एम. ई. भवनात सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाने पुणेकर रसिकांच्या मनात रामभक्तीची भावना अधिक दृढ केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »