वारजेतील आकाश नगर येथे हिंदू एकतेचा भव्य जल्लोष.
साद – प्रतिसाद ऑनलाईन.
वारजे (पुणे), दि. २६ मार्च: श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर आकाश नगर वस्ती, सिद्धेश्वर नगर येथील श्री विश्वकर्मा मंदिर परिसरात ‘विराट हिंदू संमेलन’ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन करताच नागरिकांचे भगवे गमचे, टोपी आणि मस्तकावर चंदनाचा टिळा लावून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. कडाक्याच्या उन्हात उपस्थितांसाठी शीतल कोकम सरबताची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात गुरुवर्य अशोकजी मोरे यांच्या भजनी मंडळाच्या सुश्राव्य व भक्तिमय भजनांनी झाली.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतमाता, प्रभू श्रीराम परिवार, भगवान श्री विश्वकर्मा आणि श्री महादेव यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना सह-संयोजक श्री विशालजी कणसे यांनी करत हिंदू संमेलनाचे महत्त्व व प्रभू श्रीरामांच्या नावाचा वैदिक अर्थ स्पष्ट केला. मातृशक्ती वक्त्या सौ. उल्का ताई मोकासदार यांनी ‘पंचपरिवर्तन’, ‘कुटुंब प्रबोधन’ आणि ‘समरसता’ या विषयांवर मार्गदर्शन करत हिंदू संस्कार जपण्याची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री श्री १००८ महामंडलेश्वर योगाचार्य सुधाकरजी पुरी महाराज यांनी हिंदू समाजाची कर्तव्ये, भूमिका आणि सध्याची आव्हाने यावर परखड भाष्य केले. “हिंदू समाज संघटित होणे ही काळाची गरज असून प्रत्येक घरातून जिजाऊ आणि शिवराय घडले पाहिजेत,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमाचे संयोजन विश्वकर्मा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री खुशीलालजी शर्मा यांनी केले. कार्यक्रमास माजी नगरसेवक श्री सुशीलजी मेंगडे, हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्री महेशजी पवळे, नगरसेविका सौ. तेजश्री ताई पवळे व श्री प्रमोद शिंदे यांची विशेष उपस्थिती होती.
या संमेलनात ४५० पुरुष, ११० महिला आणि ५० बालके अशा एकूण ६५० भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीपजी तिरकुंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहसंयोजक श्री चंदनजी अटक यांनी केले. कार्यक्रमाची सांगता प्रभू श्रीराम व भगवान श्री विश्वकर्मा यांच्या आरतीने झाली. उपस्थितांना खिचडी व लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला.


