आदित्य गार्डन वस्तीतील भव्य हिंदू संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; २५०० हिंदू बांधवांची उपस्थिती.
साद – प्रतिसाद ऑनलाईन.

पुणे : वारजे परिसरातील आदित्य गार्डन वस्ती येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य हिंदू संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संमेलनासाठी जवळपास २५०० हिंदू बंधू-भगिनी उपस्थित राहिले. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

संमेलनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पुरी, शाकभाजी, मसालेभात आणि साजूक तुपातील शिरा असा महाप्रसाद सुमारे २५०० नागरिकांनी आनंदाने ग्रहण केला.

या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी आदित्य गार्डन वस्तीतील जवळपास ४० जणांची (पुरुष व महिला) टीम गेल्या ४५ दिवसांपासून सातत्याने परिश्रम घेत होती. मागील १० ते १२ दिवसांत अनेक नवीन कार्यकर्तेही या उपक्रमात सहभागी झाले. सुमारे साडेसहा लाख रुपयांचा खर्च असलेले हे संपूर्ण आयोजन वस्तीतील नागरिकांच्या लोकसहभागातून व निधी संकलनातून करण्यात आले.

कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन जवळपास २५०० घरांना निमंत्रण पत्रिका दिल्या. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक या संमेलनाला उपस्थित राहिले. एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असूनही कार्यक्रम शेवटपर्यंत उत्साहात पार पडला.
या संमेलनाच्या निमित्ताने सामाजिक समरसतेचाही सुंदर अनुभव सर्वांना आला. सोसायटीमध्ये घरकाम करणाऱ्या महिला, सफाई कर्मचारी तसेच म्हाडा कॉलनीतील नागरिकांना प्रत्यक्ष घरी जाऊन निमंत्रण देण्यात आले. तसेच परिसरातील लहान-मोठे दुकानदार व विविध व्यावसायिकांनाही निमंत्रण देण्यात आले. त्यामुळे हा उपक्रम सर्वसमावेशक ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.


