ताज्या घडामोडी

भाजपाचे सरचिटणीस विशाल रामदासी यांची कर्वेनगरातील नशेखोरीप्रकरणी पोलीस प्रशासनाकडे कारवाईची मागणी.


साद – प्रतिसाद ऑनलाईन.

पुणे : कर्वेनगर परिसरात वाढत्या नशेखोरीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विशाल वसंतराव रामदासी यांनी पोलिस प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.

रामदासी यांनी दिलेल्या निवेदनानुसार, श्रीमान सोसायटी व कर्वेनगर परिसरातील नागरिकांनी संभाजी कदम यांची भेट घेऊन परिसरातील गंभीर समस्या मांडल्या. नुकत्याच निकुंज अपार्टमेंट परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागण्याची घटना घडली होती. ही घटना अपघाती होती की त्यामागे काही घातपात आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

तसेच, गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी काही तरुणांकडून मद्यपान व अमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या कारणामुळे परिसरात गोंधळ, कचरा व अस्वच्छता वाढत असून महिलांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये व कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर कर्वेनगर परिसरात नियमित पोलिस गस्त वाढवावी, सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्यांवर कडक कारवाई करावी तसेच नशेखोर व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.

कर्वेनगर परिसरात सुरक्षित, शांत व स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही रामदासी यांनी नमूद केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »