सामाजिक

महिलाच जपतात आपले सण, संस्कृती आणि परंपरा – संदीप खर्डेकर.


पुणे | प्रतिनिधी

महिलाच जपतात आपले सण, संस्कृती आणि परंपरा – संदीप खर्डेकर अनघा जगताप ठरल्या ‘होम मिनिस्टर’च्या विजेत्या; फ्रिज आणि पैठणी जिंकण्याचा मान!

 

महिलाच आपले सण साजरे करताना संस्कृती आणि परंपरा जपतात, तसेच पुढील पिढीवर योग्य संस्कार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात, असे प्रतिपादन क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केले. महिलांच्या दैनंदिन जीवनातील धावपळीत त्यांना करमणुकीचे आणि विरंगुळ्याचे काही क्षण मिळावेत, या उद्देशाने क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात, असेही त्यांनी सांगितले.

 

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोथरूड नवरात्र महोत्सवाचा समारोप बाळकृष्ण नेहरकर प्रस्तुत ‘होम मिनिस्टर – खेळ रंगला वहिनींचा’ या कार्यक्रमाने झाला. कोथरूड येथील डी. पी. रस्त्यावरील बधाई स्वीट्स चौकात रंगलेल्या या महोत्सवाला परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

 

यावेळी महिलांच्या कार्याचा गौरव करताना संदीप खर्डेकर म्हणाले की, महिलांचे आयुष्य खडतर असते. कुटुंबातील प्रत्येकाचे मन राखण्यात आणि सर्वांच्या गरजा पूर्ण करण्यात त्या आपले आयुष्य वेचतात. सण, संस्कृती आणि परंपरा जपण्यासोबतच मुलांवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारीही त्या समर्थपणे पार पाडतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंदाचे, करमणुकीचे आणि विरंगुळ्याचे काही क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानच्या वतीने केला जातो.

 

या वेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या विश्वस्त तथा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विश्वस्त प्रतीक खर्डेकर, कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल भेलके, प्रमुख विश्वस्त उमेश भेलके, उत्सवप्रमुख सौ. श्वेताली भेलके, सौ. कल्याणी खर्डेकर, सौ. अक्षदा भेलके आणि शंभूराजे भेलके उपस्थित होते.

 

बालजत्रा, लावणी, महाराष्ट्राची लोकधारा आणि दांडिया अशा विविध कार्यक्रमांनी कोथरूड नवरात्र महोत्सव रंगला. या महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेने उपस्थितांचे विशेष मनोरंजन केले. सुप्रसिद्ध निवेदक आणि अभिनेता बाळकृष्ण नेहरकर यांनी आपल्या खुसखुशीत शैलीत कार्यक्रमाचे सादरीकरण केले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या स्पर्धेत महिलांनी विविध खेळांमध्ये आपले कौशल्य, एकाग्रता आणि चपळता पणाला लावली.

 

सौ. अनघा जगताप यांनी सर्व खेळांमध्ये प्रावीण्य मिळवत फ्रिज आणि पैठणी जिंकली आणि ‘होम मिनिस्टर’च्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या सौ. अनिता ओवांडकर यांनी टीव्ही जिंकला, तर तृतीय क्रमांकाच्या सौ. प्रियांका शिंदे यांनी कपाट जिंकले. सौ. अर्चना मुनी यांनी गॅस शेगडी, तर पाचव्या क्रमांकाच्या सौ. दीपाली जोशी यांनी टेबल फॅन जिंकला.

 

सर्व विजेत्यांना नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, उत्सवप्रमुख श्वेताली भेलके, कल्याणी खर्डेकर आणि अक्षदा भेलके यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

 

या कार्यक्रमाला भाजपा सरचिटणीस दीपक पोटे, नगरसेविका रुपालीताई पवार, संतोष लांडे, सचिन मोकाटे, अॅड. प्राची बगाटे, गोविंद थरकुडे, वैभव जमदाडे, समीर ताडे, विठ्ठल मानकर, पूनम चव्हाण, पूनम कारखानीस, मालन सरवदे, कविता सदाशिवे, रोशन चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

कोथरूडमधील डी. पी. रस्त्यावरील बधाई स्वीट्स चौकात आयोजित या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांना ध्वनिक्षेपकाच्या आवाजाचा त्रास होऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल भेलके आणि प्रमुख विश्वस्त उमेश भेलके यांनी सांगितले.

 

महिलांच्या सांस्कृतिक योगदानाचा गौरव, मनोरंजनाची मेजवानी आणि उत्साहपूर्ण स्पर्धेची रंगत अशा वातावरणात कोथरूड नवरात्र महोत्सवाची सांगता झाली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »