“एनडीए रोडवर कामाचा बोजवारा! जुन्या रंबलरवर अर्धवट रंगकाम; रात्री दिसावेत म्हणून बसवलेले कॅट्स आयही निकृष्ट दर्जाचे”.
साद प्रतिसाद | पुणे
पुणे महानगरपालिकेकडून शहरातील रस्त्यांवर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी बसवलेल्या रंबलर पट्ट्यांवर अलीकडे रंगकाम करण्यात आले आहे. मात्र वारजे मुख्य रस्त्यावर हे काम अत्यंत अर्धवट आणि निष्काळजीपणे करण्यात आल्याचे समोर आले आहे. जुन्या रंबलरवर केवळ रंग मारून काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले असून अनेक ठिकाणी पट्टे अर्धवट अवस्थेतच दिसून येत आहेत.
रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने रंबलर स्पष्ट आणि पूर्ण असणे आवश्यक असते. परंतु काही ठिकाणी फक्त थोड्याच भागावर रंग मारल्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा प्रकार धोकादायक ठरू शकतो. अचानक रंबलर आल्यास वाहनाचे संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी म्हणजेच ३१ मार्चपूर्वी बिल काढण्यासाठी घाईघाईत कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी केवळ औपचारिक रंगकाम करून काम पूर्ण झाल्याचे दाखवले जात असल्याने यामागे ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या लागेबांध्यांचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


