कोंढवे धावडे येथे नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई; ८ गाड्या व जेसीबी जप्त, २.२५ लाखांचा दंड.
साद-प्रतिसाद, पुणे
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कोंढवे धावडे परिसरातील नदीपात्रात अनधिकृतपणे बांधकामाचा राडारोडा टाकणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ८ गाड्या आणि १ जेसीबी पकडण्यात आली असून संबंधितांवर एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) अविनाश सपकाळ, उपायुक्त परिमंडळ ३ प्रसाद काटकर, सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार तसेच वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान नदीपात्रात बांधकामाचा राडारोडा टाकताना ८ वाहने आणि १ जेसीबी रंगेहाथ पकडण्यात आली. संबंधित वाहनांवर प्रत्येकी २५ हजार रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या कारवाईवेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक संदीप चव्हाण, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक नितीन लोखंडे, आरोग्य निरीक्षक वैभव घटकांबळे, प्रदीपकुमार राऊत, कविता शिसोलीकर, रूपाली शेडगे, प्रशांत दामले तसेच मुकादम अक्षय लांडगे, सेवक अशोक आंधळे आणि वाहन चालक सचिन अडसूळ उपस्थित होते.
नदीपात्र तसेच सार्वजनिक ठिकाणी राडारोडा अथवा कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.


