ताज्या घडामोडी

पुणे मनपाचे विद्युत खांब कधी घेणार मोकळा श्वास? वारजे–माळवाडी परिसरात अनधिकृत बॅनरचा विळखा.


साद – प्रतिसाद ऑनलाईन.

पुणे (प्रतिनिधी) :

वारजे–माळवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या विद्युत खांबांवर सध्या अनधिकृत बॅनर व जाहिरातींचा अक्षरशः विळखा पडलेला दिसत आहे. परिसरातील अनेक व्यावसायिकांनी नियमांची पायमल्ली करत या खांबांवर मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे फलक व बॅनर लावले असून त्यामुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत आहे.

या बॅनरपैकी अनेक बॅनर जुने व फाटलेल्या अवस्थेत असून काही ठिकाणी ते थेट विद्युत खांबांवर पडलेले दिसत आहेत. अशा परिस्थितीत एखाद शॉर्ट सर्किट किंवा अपघात घडल्यास परिसरातील नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

 

विशेष म्हणजे, या जाहिरातींसाठी संबंधित जाहिरातदारांकडून महानगरपालिकेला कोणतेही अधिकृत चलन भरले जात नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महानगरपालिकेला कोणताही महसूल मिळत नसतानाही वर्षानुवर्षे हे बॅनर तशाच अवस्थेत लटकलेले आहेत. काही ठिकाणी तर एका खांबावर पाच ते सहा जाहिरातींचे फलक लावलेले आढळतात.

या पार्श्वभूमीवर वारजे–कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाशचिन्ह (जाहिरात) विभागाकडून या प्रकाराकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याची टीका स्थानिकांकडून केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनधिकृत बॅनर तात्काळ हटवून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »